आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून पुण्यभूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा सुगंध आहे. या सुगंधामुळे महाराष्ट्राला शतकानुशतके संतांची मांदियाळी लाभली. या आपल्या संतांनी विश्वकल्याणाच्या जाणिवेतून महाराष्ट्र भूमी, महाराष्ट्रातील माणसांची मनं पावन केली. आपले संत, त्यांची चरित्रं, त्यांचं कार्य, त्यांचं साहित्य हा आपला अमूल्य ठेवा आहे, प्रसन्न मनानं जगण्याची शक्ती आहे. आपल्या जीवनाचं ते अधिष्ठान आहे. ‘या संतांसी भेटता| हरे संसाराची व्यथा|’ हा अनुभव त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या मनन-चिंतनानं येतो.
प्रेम ही प्रत्येकाची जगण्याची शक्ती आहे. प्रेम म्हणजे भक्ती. ‘आम्ही प्रेमसुखाची लेकरं’ ही ओळख करून देणारे संत म्हणजे आपली सुखाची सोबत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांनी भक्तीचं मंदिर उभं केलं. भक्तराज नामदेवांनी किंकर वृत्तीने भक्तीची पताका पंढरपूरपासून पंजाबपर्यंत नेली. प्रपंच्याचा परमार्थ करणार्या शांतिब्रह्म एकनाथांनी अनाथांना सनाथ केलं, ‘भागवत’ रूपी कणा दिला. जगद्गुरू तुकारामांची अभंगवाणी म्हणजे महाराष्ट्राचं वैचारिक धन. संत तुकोबारायांना भागवताच्या मंदिराचा कळस होण्याचं भाग्य लाभलं. या कळसावरील ध्वज म्हणजे भक्तीला शक्तीची जोड देणारे समर्थ रामदास.
हे पाचही संत म्हणजे महाराष्ट्राचे पंचप्राण. या पाचही संतांचा विश्वधर्म मानवजातीच्या उत्क्रांतीसाठी होता. हे पाचही संत विश्वशांतीच्या ध्येयाने झपाटले होते. ध्येय गाठण्याचा प्रत्येकाचा मार्ग निराळा असला तरी अंतिम ध्येय एकच होते. समर्थ रामदासांच्या उक्तीतून याची प्रचीती येते
‘साधु दिसती वेगळाले| परि ते स्वरुपी मिळाले|
अवघे मिळौनि एकचि जाले| देशातीत वस्तू॥
देवा, या संतांच्या सोबतीचं दान नित्य दे.