‘आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. या भूमीत जन्म घेतलेल्या समाजाला संतांपासून संस्कारक्षम, शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला. संस्कारांचा संपन्न वारसा या भूमीनं मराठी मनाला दिला. त्यामुळे मराठी मनाचा कणा ताठ झाला. महाराष्ट्रात संत-परंपरेची मौक्तिकमाला आहे. संत म्हणजे साक्षात देव. जगाच्या कल्याणासाठी विधात्यानं संतांना इहलोकी पाठविलेलं असतं. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह झिजवीती ऊपकारे |’ हे संतांचे मुख्य लक्षण !
संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे. या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. संतांनी मानवतावादाची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘जनी जनार्दन’ हा त्यांचा सहज भाव. संत हे समाजापुढील आदर्श असल्यामुळे त्यांचं जीवन समजून घेण्याची ओढ प्रत्येक मनाला वाटते. अनासक्त माणूस लोकोद्धाराचं केवढं प्रचंड कार्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली महाराष्ट्रातील संत-परंपरा ! खरंच महाराष्ट्रातील संतमंडळी म्हणजे आपल्या संस्कृतीचे कळस !
‘काय मानू मी संतांचे उपकार
मज निरंतर जागविती|’