भारतीय शिक्षणाचा धावता आढावा घेत असतानाच महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासाचा सविस्तर तपशील प्रस्तुत पुस्तकात मांडण्यात आला आहे. शिक्षणविषयक प्रमुख आयोग, समित्या, योजना या संदर्भात विचार करणारे स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. याशिवाय शिक्षणाच्या विकासात, शिक्षकांच्या प्रशिक्षणात आणि शाळा-महाविद्यालये, विद्यापीठांच्या प्रशासनात मार्गदर्शन, नियंत्रण आणि अंमलबजावणी करणार्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांचा परिचय करून दिला आहे.
अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत झालेल्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचा आढावा घेत असतानाच प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण या सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असणार्या अनौपचारिक शिक्षणाच्या विविध अंगांचाही यात समावेश आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासाचे प्रेरणास्थान असणार्या प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञांचा समावेश या पुस्तकाचे बलस्थान आहे.
काही प्रयोगशील तसेच, अग्रेसर शिक्षण संस्थांचा परिचय करून देताना तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा शाखांशी निगडित शिक्षणाबरोबरच वाणिज्य-व्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध पर्याय ‘नवे दालन-नव्या संधी’ या प्रकरणात समाविष्ट केले आहेत. शिक्षणक्षेत्रातील या बदलत्या जगाची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच पालक, संस्थाचालक यांना उपयुक्त ठरू शकेल असा विश्वास वाटतो.र