मानवशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही ज्ञानशाखांमध्ये भारतीय लिंगभावविषयक परिप्रेक्ष्य काहीसे दुर्लक्षित राहिले. या ज्ञानशाखांनी स्त्रियांचे प्रश्न आणि लिंगभावाचे सत्तासंबंध हे विषय बर्याच वेळा एक स्वतंत्र कप्पा म्हणून हाताळले. याउलट स्त्रियांच्या चळवळीला आणि स्त्रीवादाला कधी मानवशास्त्राची, समाजशास्त्राची ज्ञानशाखा फारशी महत्त्वाची वाटली नाही.
लीला दुबे यांनी मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहीम या ग्रंथातून लिंगभाव गोतावळा आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना बरीचशी परस्परांशी संबंधित असणारी अभ्यासक्षेत्रे खुली केली. भरपूर आणि विस्ताराने केलेला क्षेत्रीय अभ्यास, वैयक्तिक कथने त्याप्रमाणे लोकलेखापद्धतीचा साठा आणि सिद्धान्ताचा पाया असे सर्व या ग्रंथात एकवटलेले आहे. बहुविध आणि बर्याचवेळा असामान्य स्त्रोतांमधून आपले पुरावे गोळा करताना लेखिकेने एत्तदेशीय विचारांचे काही क्रम बोलीभाषेचे आकार तसेच प्रतीके आणि रूपके आणि ज्ञानसामान्यांची वृत्तवैकल्ये आणि व्यवहार या सार्यांचा आधार घेतला आहे. दैनंदिन जीवनाच्या घटनांमधून आणि अनुभवांमधून लीला दुबे आपल्यापर्यंत जनसामान्यांचा आवाज पोचवितात.