नुकतीच मध्यरात्र झाली असताना बिन लादेन राहत असलेल्या कंपाउंडमधले रहिवासी जवळच कुठेतरी झालेल्या स्फोटांच्या आवाजाने खडबडून जागे झाले. बिन लादेनची मुलगी मरियम 'काय झालं' हे विचारण्यासाठी बिन लादेनच्या शयनगृहाकडे धावली. त्याने तिला ''खाली जाऊन झोप'' असं सांगितलं. त्यानंतर तो त्याची पत्नी अमालला म्हणाला, ''दिवा लावू नकोस.'' नक्कीच, ते बिन लादेनच्या तोंडचे अखेरचे शब्द ठरणार होते.
ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे ९/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा' हा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्षं अमेरिकेच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोधमोहिमेची ही कथा लक्षवेधी आणि थरारक ठरते!
पीटर बर्गन हे बिन लादेन आणि अल्-कायदावर लिहिलेल्या 'बेस्टसेलर' पुस्तकांचे लेखक आहेत. लादेनला भेटलेल्या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. ९/११च्या हल्ल्यापूर्वी त्यांनी बिन लादेनची मुलाखत घेतली होती. ते सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि न्यू अमेरिकन फाउंडेशनचे संचालकही आहेत. बर्गन यांची सखोल अभ्यासू वृत्ती आणि व्हाइट हाउस अधिकारी, सीआयए, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर यांच्याशी असलेला थेट संपर्क यांमुळे हे पुस्तक बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवज ठरते.