जगाच्या इतिहासात मध्ययुगाला एक विशिष्ट स्थान आहे. त्याचे कारण या कालखंडात राष्ट्र-राज्यांचा (Nation State) उदय झाला. भारत याला अपवाद नव्हता. मोगल साम्राज्यशाहीच्या विघटनाला सतराव्या शतकातच प्रारंभ झाला होता, अन्य विदेशी सत्ताही लोप पाऊ लागल्या होत्या. अशा या काळात महाराष्ट्राची संस्कृती, धर्म, भाषा आणि स्वतंत्रता यांच्या संरक्षणासाठी आणि अभ्युदयासाठी शिवाजी महाराजांची सतराव्या शतकात ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली आणि ‘मराठी राष्ट्र’ उदयास आले.
अठराव्या शतकात मराठी सत्तेने सारा भारत उपखंड प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्यामुळे देशी-विदेशी लोकांना मराठ्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले. मराठी सत्तेचा उदय, विस्तार आणि र्हास या चित्तवेधक विषयावर स्थानिक, राष्ट्रीय आणि विलायती पातळीवर, विविध भाषांतून आणि विविध स्तरांतील व्यक्तीकडून लेखन होऊ लागले आणि आजही होत आहे. संस्कृत, मराठी, फार्सी, पोर्तुगीज, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, डच आणि अन्य भाषांतून मराठ्यांच्या कार्याची नोंद होऊ लागली.