भारतीय राष्ट्रवादाच्या विचारपरंपरेत मुस्लीम विचारवंतांचे मोठे योगदान आहे. परंतु, पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनामुळे फुटीरवादी राजकारण करणारे मौलाना महंमद अली, शौकत अली, बॅरिस्टर जिना आणि मोहम्मद इकबाल हेच तेवढे मुस्लीम नेते होते असा समज पसरत गेला, तो आजतागायत ! वास्तविक विभाजनवादी विचारांना छेद देऊन भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे कैक लहानमोठे मुस्लीम नेते होऊन गेले. या मुस्लीम विचारवंतांनी समकालीन फुटीरवादी मुस्लीम नेत्यांचा वेळोवेळी समाचारही घेतला आहे. सर सय्यद अहमद यांच्या समकालीन असणारे तुफेल अहंमद मंगलोरी यांनी सर सय्यद यांच्या फुटीर राजकारणावर प्रकाश टाकून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. मौलाना हुसैन अहमद मदनी हे भारताच्या संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पवित्र कुरआनच्या आधारे संमिश्र राष्ट्रवादाची मांडणी केली होती. मौलाना हसरत मोहानी हे जसे गझलकार म्हणून प्रसिद्ध तसे ते राष्ट्रवादाचे प्रखर समर्थकही होते. लोकमान्य टिळकांचे ते अनुयायी होते. मोहानी यांनीच प्रथम पूर्ण स्वराज्याचा सिद्धान्त मांडला. तर डॉ. रफिक झकेरीया यांनी बॅरिस्टर जिना यांच्या फुटीरतेवर चर्चा करणारे पुस्तकच लिहिले आहे. अशा या भारतीय मुस्लीम विचारवंतांची आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेची प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी निष्पक्षपणे मांडणी केली आहे.
या पुस्तकात राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या भारतीय मुस्लीम विचारवंतांविषयी वाचणे रोचक तर आहेच शिवाय त्यांच्याविषयी अधिक कुतूहल जागवणारे आहे, हे निश्चित !