खूप मोठा होऽऽ असं म्हणत मी त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. एकदम चहूकडून आवाज उमटले, हराम है.. हराम है, गैर औरत का गैर मर्द को छूना हराम है| मला धक्काच बसला. स्त्री म्हणजे काय हे ही लहानलहान, अबोध-अज्ञ मुलं मला सांगत होती. टीव्ही कॅमेरे चालू होते. माझा कॅमेरा कॅमेरामनकडे देत मी त्याला म्हटलं की, माझा मेहदीबरोबर एक फोटो काढ. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच मेहदीनं कठोर आवाजात सांगितलं, मी स्त्रीबरोबर माझा फोटो काढू शकत नाही, कारण इस्लाममध्ये हे पाप मानलेलं आहे.
हिंदी साहित्यविश्वात आपल्या चतुरस्र संचाराने वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक नासिरा शर्मा आपल्या परखड आणि अंतर्भेदी दृष्टीकोनामुळे प्रस्थापित साहित्यिक वर्तुळाबाहेरच राहिल्या. मात्र तरीही एका व्रतस्थ वृत्तीनी साहित्यनिर्मितीशी निष्ठा राखत आपल्या कलाकृती सादर करत राहिल्या. अशा या बहुआयामी भारतीय व्यक्तिमत्त्वाला अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
उर्दू, हिंदी, फारसी, पुश्तु आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असलेल्या, व्यासंगी पत्रकार असणार्या या बंडखोर भारतीय साहित्यिकाच्या साहित्याचा परिचय करून देणारा हा संग्रह.....