पाश्चात्त्य राजकीय विचारवंत हा महत्त्वाचा अभ्यासविषय जगभरातील सर्वच विद्यापीठांतून शिकविला जातो. हा विषय शेकडो वर्षांपासून सातत्याने विकसित होत आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विकासक्रमात कधी खंड पडल्याचे दिसत नाही.
पाश्चिमात्य राजकीय विचारांचा इतिहास, राजकीय विचारप्रणाली, राजकीय विचारवंत आणि राजकीय संस्था यांच्या ऐतिहासिक आढाव्याद्वारे गेल्या अडीच हजार वर्षांच्या राजकीय संस्कृतीचा वेध घेण्याचे महत्त्वाचे काम या विषयाने केले आहे.
सॉक्रेटिस, प्लेटो आणि ऍरिस्टॉटल हे प्राचीन ग्रीक विचारवंत; सेंट ऑगस्टीन, थॉमस ऍक्विनास, मर्सिलिओ ऑफ पदुआ हे मध्ययुगीन राजकीय विचारवंत; मॅकिआव्हेली हा आधुनिक युगाच्या आरंभीचा राजकीय विचारवंत; हॉब्ज, लॉक, रूसो, मिल आणि मार्क्स हे आधुनिक राजकीय विचारवंत; या सर्वांच्या बरोबरच विसाव्या शतकातील समकालीन राजकीय विचारवंतांशिवाय मानवी संस्कृतीच्या राजकीय अंगांचा आपण विचारदेखील करू शकत नाही.
मराठी विचारवंतांनी विसाव्या शतकात या विषयाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करण्यास प्रारंभ केला. मुंबई, पुणे आणि नागपूर ही विद्यापीठे या बाबतीत अग्रेसर राहिली.
आता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांत या विषयाचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर वर्गांचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि अन्य जिज्ञासू अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, अस