‘प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप’ या ग्रंथाचे लेखक - प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म २२ जानेवारी १९२० रोजी जमखंडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेतून झाले. बी.ए.ला त्यांना मराठीचे ‘तर्खडकर सुवर्णपदक’ मिळाले.
दैनिक ‘ज्ञानप्रकाश’ व ‘महाराष्ट्र मासिक’ यांमध्ये काही वर्षे ते संपादकवर्गात होते. ‘नवा महाराष्ट्र’ नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी चालविले. बेळगावच्या लिंगराज आणि राणी पार्वतीदेवी महाविद्यालयांत अकरा वर्षे काम केल्यानंतर धुळ्याच्या एस. एस. व्ही. पी. कॉलेजमध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून १९६६ पर्यंत ते काम करीत होते. त्यानंतर धुळे येथील विद्यावर्धिनी संस्थेच्या वाङ्मय आणि वाणिज्य महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून ते १९८० च्या जानेवारीत निवृत्त झाले.
प्राचीन मराठी वाङ्मय, विशेषत: संतवाङ्मय हा त्यांचा व्यासंगाचा खास विषय आहे. सूक्ष्म शास्त्रीय अभ्यासाच्या जोडीला सामाजिक दृष्टी असल्यामुळे प्रा. शेणोलीकरांच्या लेखनात व संपादनात एकप्रकारचा नवा दृष्टिकोन दिसून येतो. ‘ज्ञानेशांची अमृतवाणी’, ‘नामयाची अमृतवाणी’ आणि ‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ (सहकार्याने) हे त्यांचे ग्रंथ अभ्यासकांना एक नवी दृष्टी देतात. ‘मायणीची मंजुळा’ सारखी त्यांची ललितकृती अशीच लक्ष्यवेधी आहे.
निवृत्तीनंतरच्या काळात विद्यापीठ अनुदान मंडळाच्या प्रोत्साहनाने
श्री. शेणोलीकरांनी ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील तत्त्वज्ञानात्मक संज्ञांचा वर्णनात्मक कोश’ (टंकलिखित पृष्ठे सुमारे ९५०) सिद्ध केला आहे. त्यासाठी त्यांनी लिहिलेली आठपानी प्रस्तावना मराठी संतांच्या तत्त्वज्ञानावर नवा प्रकाश टाकते. (प्रस्तुत ग्रंथाचे परिशिष्ट पहा.)