"लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांचे कार्य आपणाला जगाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे काम आदर्शवत असून ते आजदेखील दिशादर्शक आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराज आपले आदर्श आणि मार्गदर्शक ठरतात. त्यादृष्टीने सिद्ध केलेला हा ग्रंथ त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि योगदान अधोरेखित करणारा आहे.
शाहू महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेले अभिनव प्रयोग तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी होते. त्यांचे निर्णय घेण्याचे धारिष्ट्य, त्यामागील सर्जनशीलता, बौद्धिक चमक दाखवणारी कल्पकता, ती अमलात आणण्याची विलक्षण इच्छाशक्ती आणि गतिमानता आजच्या राज्यकर्त्यांना विचारप्रवृत्त करायला लावणारी आहे. त्यांची ही प्रयोगशीलता अभ्यासाच्या अनेक नव्या दिशा सूचित करणारी आहे. त्यादृष्टीने केलेले प्रस्तुत ग्रंथाचे संपादन अतिशय मौलिक ठरते.
या ग्रंथात मान्यवर अभ्यासकांनी शाहू महाराजांच्या योगदानाचे स्वरूप नेमकेपणाने समोर आणले आहे. महाराजांची दृष्टी अभिनव होतीच. याबद्दल ग्रंथामध्ये अभ्यासपूर्ण लेख आले आहेत. या लेखांमधून शाहू महाराजांकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळतो. तथापि, रूढ राजकीय इतिहास लेखनाची पद्धती अव्हेरून राजकीय इतिहास लेखनाला नवे परिमाण देणारी दृष्टी या ग्रंथातून सर्वप्रथमच समोर येत आहे. एखाद्या निर्णयात किंवा घटना-प्रसंगांमध्ये राजकारणाची दिशा बदलण्याची क्षमता असते, त्याचा मागोवा ग्रंथामधील लेखात घेतला आहे. हा ग्रंथ वाचकांना छत्रपती शाहू महाराजांकडे पाहण्याची नवी दृष्टी प्रदान करणारा असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
डॉ. नंदकुमार मोरे
प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर "