आपल्या शरीरातील सर्व क्रिया या निसर्गचक्रानुसार होत असतात. परंतु, आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याकडून निसर्गचक्राच्याविरुद्ध आचरण होत असते; त्यामुळे सध्या लहान वयापासूनच अनेक आजार झालेले दिसून येत आहेत. ‘आयुर्वेद’ हे आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. यामध्ये आजार व उपचार यांचे जसे वर्णन आहे तसेच आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावयाची याचेसुद्धा विस्तृत वर्णन आहे. या पुस्तकामध्ये आयुर्वेदानुसार आपला दिनक्रम कसा असावा, तसेच प्रत्येक ऋतुनुसार आपल्या आहारात व आचरणात काय बदल करावे याचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. आहारातील पदार्थांचे गुणधर्म, आहार कसा, कोणी, केव्हा घ्यावा याची माहिती दिली आहे. ‘झोप’ व ‘पाणी’ या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे. स्त्रीने गर्भधारणेपासून ते बाळंतपणानंतर काय काळजी घ्यावयास हवी याविषयी मार्गदर्शन केले आहे. आयुर्वेदामधील पंचकर्मे व इतर कर्मे यांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे या पुस्तकामधील माहिती ही सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी मोलाची ठरेल, यात शंका नाही.