समकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व व जातसंघटना हे पुस्तक तीन विभागांत विभागले आहे. पहिला भाग सोशल इंजिनिअरिंगच्या राजकीय प्रक्रिया व चळवळीवर बेतलेला आहे. नवहिंदुत्व या घटकाच्या आधारे कृतिसज्जता कशी घडली या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे.
मराठा समाजामध्ये कॉंग्रेसविरोध, सहकार चळवळविरोध, उच्च जातीविरोध, ओबीसी विरोध, अभिजन विरोध असा आर्थिक व राजकीय असंतोष धुमसत आहे, त्यांचेही स्पष्टीकरण केले आहे.
नव्वदीनंतरच्या राजकारणाचे जातसंघटना हे एक वैशिष्ट्य ठरतेे. ओबीसी व दलित समाजातील जात संघटनांचे गेल्या तीन दशकातील केलेले राजकीय दावे, भौतिक हितसंबंधाची स्पर्धा आणि अस्मितांचे राजकारण तसेच गेल्या तीन दशकातील ओबीसी व दलित राजकारणांचे अर्थ स्पष्ट केले आहेत.
नवहिंदुत्व चळवळीतील सत्तासंघर्ष व सत्तासंपादनाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रकल्प व हिंदू राष्ट्रनिर्मितीची चळवळ, जात-संघटनांच्या चळवळीतील इतर मागासवर्ग व अभिजनांमधील सत्तासंघर्षदेखील सविस्तरपणे मांडला आहे.
नवहिंदुत्व आणि जातसंघटना यांचे राजकीय चळवळ या चौकटीत विश्लेषण करणारे हे पहिलेच पुस्तक आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते - कार्यकर्ते व समर्थक - विरोधक यांना अभ्यासासाठी या पुस्तकातून नवे मुद्दे मिळू शकतील, अशी खात्री आहे.