नामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणार्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या म्हणतात, त्या या जनाईच्याच ! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या.
समग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यंाच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई- चरित्र व काव्य’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो !