आजचं शैक्षणिक वातावरण सतत बदलतं आणि गतिमान आहे. मुख्याध्यापकांना शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयं, माध्यमं, देणगीदार आणि हितचिंतक, राजकीय पक्ष, समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती अशा अनेक गुंतागुंतीच्या घटकांना एकाच वेळी सामोरं जावं लागतं; आणि या घटकांची शाळेबद्दलची सकारात्मक मानसिकता कायम राखण्याचं आव्हानही पेलावं लागतं. याशिवाय, शैक्षणिक बाबींचं, तसंच सहशालेय आणि बहिःशालेय उपक्रमांचं नियोजन, प्रशासकीय कामांचं नियोजन अशा अनेक आघाड्यांवर काम करताना मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतेचा अक्षरशः कस लागतो. याबरोबरच मातृसंस्थेची विचारप्रणाली, ध्येय-धोरणं, नियम, शिस्त यांचं पालन करणं, संस्थेच्या इतर शाळांच्या तुलनेत आपल्या शाळेची स्पर्धात्मकता जोपासणं आणि संस्थाचालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणं यासाठीही मुख्याध्यापकांना कसून प्रयत्न करावे लागतात.
आजकाल अनेकदा सेवा ज्येष्ठतेच्या निकषामुळे एखाद्या शिक्षकाला मुख्याध्यापक होण्याची अचानक संधी मिळते. अशा वेळी शाळेशी संबंधित सगळे निर्णय त्याला घ्यावे लागतात. मात्र यासाठी खंबीरपणा, एखादा प्रश्न हाताळण्यातलं कौशल्य, व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय अनुभव, कायदे आणि शासकीय नियमांची माहिती अशी अत्यावश्यक वैशिष्ट्य या नवख्या मुख्याध्यापकामध्ये अभावानेच आढळतात.
ही सगळी गुंतागुंत पाहता, मुख्याध्यापकांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असणं आणि त्यांच्याकडे नेतृत्वक्षमता असणं ही त्या पदाची गरज झाली आहे. वरवर पाहताना ‘नेतृत्वक्षमता’ हा शब्द साधा आणि सोपा वाटला, तरी वास्तवात ही क्षमता म्हणजे कौशल्य, प्रेरणा, दृष्टिकोन, वैचारिक-भावनिक-सामाजिक जाणिवा, ज्ञान, माहिती अशा वेगवेगळ्या गुणांचा परिपाक आहे. त्यामुळे सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतांचा विकास करण्यासाठी, त्यांच्या भूमिका आणि जबाबदार्या त्यांच्या नेमकेपणाने लक्षात आणून देण्यासाठी, त्यानुसार त्यांची मानसिकता घडवण्यासाठी, तसंच त्यांच्या प्रशासकीय क्षमता विकासित करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. याशिवाय महाराष्ट्रातल्या सगळ्या खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे मुख्याधापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांच्यासाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.