ती रात्र वादळी होती. बाहेर वारा रोंरावत होता. खिडक्यांवर पावसाचे थेंब थडाथडा आदळत होते. वादळाच्या इतक्या प्रचंड आवाजामध्ये एका घाबरलेल्या स्त्रीची अमानवी किंकाळी अचानक ऐकायला आली. हा माझ्या बहिणीचाच आवाज आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पलंगावरून ताडकन उठले आणि पडवीमधून पुढे धावत गेले, तर माझ्या बहिणीच्या खोलीचं दार उघडलं आणि सावकाश किलकिलं होत त्याची उघडझाप होत राहिली. मी घाबरून बघत राहिले. आतमधून काय बाहेर येईल याची मला काहीही कल्पना नव्हती. तेवढ्यात माझी बहीण दाराकडे आली. तिचं अख्खं शरीर एखाद्या दारुड्यासारखं झोकांड्या खात होतं. मी तिच्याकडे धावले आणि तिला मिठी मारली, पण त्याच क्षणी ती जमिनीवर कोसळली.
शेरलॉक होम्सच्या या साहस कथा अक्षरश: श्वास रोखून धरायला लावतात; वाचकाला गुंग करून सोडतात. तसंच या कथांमधून आपल्याला सर कॉनन डॉयलच्या प्रतिभेची पावती मिळाल्याशिवाय राहत नाही.