बांगला देशाच्या फाळणीवर बेतलेलं ‘ब्लड टेलिग्राम’ हे पुस्तक म्हणजे शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पूर्व पाकिस्तानमधल्या (आता बांगला देश) जनतेवर पाकिस्तानी लष्कराने अनन्वित अत्याचार केले, लाखोंच्या संख्येने निष्पाप नागरिकांच्या कत्तली केल्या आणि निर्वासितांना देशोधडीला लावून भारताचा आश्रय घेण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे बांगला देशाची फाळणी ही विसाव्या शतकातल्या सगळ्यात दयनीय शोकान्तिकांपैकी एक ठरली. केवळ शीतयुद्धातल्या डावपेचाचा भाग म्हणून नव्हे, तर भारत आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आकसापोटी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किसिंजर यांनी बांगला देशातल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणार्यार अमेरिकी अधिकार्यांजची गळचेपी केली, अमेरिकी कायद्याचं उल्लंघन करून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला आणि भारताविरुद्ध युद्धात उतरण्यासाठी चीनची मनधरणी केली. त्यामुळे या युद्धाचा आवाका अकारण वाढला आणि व्यापक युद्धसमान परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १९७१च्या बांगला देशाच्या स्वातंत्रयुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करून अमेरिकेच्या भूमिकेतला दुटप्पीपणा उघडकीला आणणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं!