‘द कॉल ऑफ द वाइल्ड’ ही युकॉनच्या बर्फमय प्रदेशातल्या बक नावाच्या एका कुत्र्याची त्याच्याच दृष्टिकोनातून सांगितलेली कहाणी आहे. सुसंस्कृतपणाकडून आदिम हिंस्रपणाकडे त्याने केलेल्या प्रवासाचा हा लेखाजोखा आहे; पण या श्वानाच्या रोमांचक कथेतून आपल्यासमोर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोन्याच्या हव्यासाने कॅनडामधल्या क्लोंडाईक प्रातांत गोळा झालेल्या लोकांचं जग उभं राहतं. एकीकडे हिंसक आणि निष्ठुर जगाचं वर्णन करणारी ही कथा दुसरीकडे माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्याविषयी सांगितलेली एक हळुवार साहसकथाही आहे.
मुक्या प्राण्यांवर अतोनात प्रेम करणार्या लंडनला स्लेडला जुंपल्या जाणार्या कुत्र्यांच्या मनीची व्यथा उमजून आली आणि अपार कणवेने भारून, श्वानजीवनाचे अंतरंग उलगडून दाखविणारी ‘बकची’ कहाणी त्याने जगापुढे मांडली. जगभरातल्या साहित्याप्रेमींमध्ये तुफान लोकप्रिय असलेली आणि निर्विवादपणे ‘अभिजात’ ठरलेली ही कथा आता मराठी वाचकांच्याही भेटीला येत आहे. ही कहाणी वाचकांना मोहून टाकते, थरारून सोडते आणि विचार करायलाही भाग पाडते.