डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधून सन १९७१मध्ये पीएच.डी. मिळवली. कैक वर्षे भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातूनच ‘द मराठाज्’ हा ग्रंथ निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर मराठा राज्यव्यवस्थेशी निगडित कागदपत्रांचा प्रचंड साठा संशोधकांसाठी उपलब्ध झाला. सरदार घराण्यांकडील कागदपत्रेही उपलब्ध झाली. डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी चिकित्सक वृत्तीने या साधनांचा अभ्यास केला असून मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे. मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती आणि कायदेशीर हक्कांविषयी ते किती सजग होते अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हत्यारबंद टोळ्यांपासून सुसज्ज कवायती लष्करापर्यंत मराठ्यांच्या सैन्यात झालेला बदल, मराठ्यांनी विकसित केलेली महसूल व्यवस्था आणि त्यांनी नोंदलेल्या माहितीच्या भांडाराचा इंग्रजांना झालेला उपयोग अशा महत्त्वाच्या गोष्टींचीही विस्तृत चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल. मराठा कालखंडातील सामाजिक परिवर्तनाकडेही लक्ष वेधण्यात डॉ. गॉर्डन यशस्वी झाले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते.