टिंकर टेलर सोल्जर स्पाय म्हणजे क्षणोक्षणी कुतूहल वाढवत नेणारी उत्कृष्ट कादंबरी! स्मायली आणि त्याचा शीतयुद्धातला प्रतिस्पर्धी कार्ला यांच्यातला हा सामना चढत जातो. वास्तव, गुंतागुंत आणि रहस्यमयता यांतली उत्कंठा ही कादंबरी शेवटपर्यंत कायम राखते. कुठेही भडक न होता तर्कसंगत आकार घेत जाते. म्हणूनच एकूण रहस्यमय साहित्यात कादंबरीचा हा पट वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.
सर्कसचा आधीच एक दारुण पराभव झाला आहे. याचा परिणाम म्हणजे एका माणसाच्या पाठीत झाडलेल्या दोन गाळ्या! पण सर्कसच्या आतच याहून मोठा धोका अजूनही दबा धरून आहे : ३० वर्षं सर्कसमध्ये खोलवर रुतलेला मोल. या खोलवर रुतलेल्या मोलचा नायनाट कसा करायचा? हा तिढा सोडवण्यासाठी सुविख्यात जॉर्ज स्मायलीला पाचारण केलं जातं. पण घरभेदी मोलचा शोध म्हणजे गुप्तहेरांवर गुप्तहेरी!
लेखक जॉन ले कारे हे त्यांच्या पिढीतले प्रथितयश आणि सातत्याने कसदार लेखन करणारे लेखक आहेत. ५० आणि ६०च्या दशकात त्यांनी ब्रिटिश गुप्तहेर संघटनेसाठी कामही केलं होतं. या अनुभवातूनच वास्तव गुप्तहेर जगतावर आधारित उत्तमोत्तम कादंबर्या त्यांनी साकारल्या. ‘टिंकर टेलर...’ या कादंबरीसोबतच त्यांच्या इतर अनेक कादंबर्यांवर दर्जेदार आणि अनेक पुरस्कार लाभलेल्या चित्रपटांचीही निर्मिती झाली आहे.