‘आचार्य देवो भव’ या उक्तीने भारतीय संस्कृतीत शिक्षक अथवा गुरूला गौरवलं गेलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला म्हणूनच परंपरेत अव्वल स्थान दिलं जातं. चांगल्या शिक्षकाच्या मुशीतून घडलेला विद्यार्थी म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य असतो.
‘तुम्ही घडवलं आम्हांला’ हे असंच विविध क्षेत्रांत चमकलेल्या ‘विद्यार्थ्यांचं’ त्यांच्या शिक्षकांविषयीचं हृद्य कथन आहे. प्रसिद्ध उद्योजक, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, विद्यापीठांचे कुलगुरू, शासकीय अधिकारी, लेखक इ. अनेक क्षेत्रांतल्या मान्यवरांनी आपल्या शिक्षकांविषयीची कृतज्ञता या लेखांतून व्यक्त केली आहे. शाळांपासून विद्यापीठापर्यंतच्या आणि देश-विदेशातल्या वेगवेगळ्या आदर्श शिक्षकांचा परिचय या पुस्तकाद्वारे आपल्याला होतो. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा आणि शिक्षक संस्कृतीचा विचार करता संपूर्ण समाजाला नवचेतना देण्यासाठी हे लेख नक्कीच प्रेरक ठरतील.