काळाची गरज लक्षात घेऊन ‘व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावरची अनेक पुस्तके सध्या बाजारात येत आहेत. याच प्रवाहातले हे आणखी एक पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण लेखिकेने ओघवत्या भाषेत या पुस्तकाची रचनाच अशी केली आहे की, जे काही मांडायचे, ते मुद्दा घेऊनच! त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या आठ-दहा पैलूंवर अतिशय महत्त्वाचे, मुद्देसूद आणि तरीही रोचक असे लिखाण या पुस्तकात एकत्र वाचायला मिळते.
व्यक्तिमत्त्वाच्या इतक्या विविध पैलूंवर एकाच पुस्तकात मार्गदर्शन करणारे मराठीतले हे बहुधा पहिलेच पुस्तक. यात सांगितलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत की, त्या तरुणांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणार आहेत, त्यांचे आयुष्य समृद्ध करणार आहेत.