व्यवसाय कोणताही असो, तो यशस्वी होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापनाची गरज असते. व्यवस्थापनप्रमुखाला बाह्य घटकांच्या उदा. शासन, सामाजिक संघटना, बाजारपेठ, बँका इत्यादींशी सतत संपर्कात राहावे लागते. तसेच कामगार वर्ग, कार्यालयीन कर्मचारी इत्यादींशी सतत विचार विनिमय करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून व्यवस्थापनात पूर्वानुमान, नियोजन, निर्णयप्रक्रिया, संदेशवहन, नेतृत्व, समन्वय व नियंत्रण इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. मानवी शरीरात मेंदूचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व व्यवसायात व्यवस्थापनाला आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात राहील, तोपर्यंत व्यवस्थापनप्रक्रिया सतत चालू राहील.
या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. व्यवस्थापनाच्या विविध कार्यांची, तत्त्वांची चर्चा केली आहे.
व्यवस्थापनाचे महत्त्व, स्वरूप, प्रकार, कार्ये, आधुनिक प्रवाह इत्यादींचे विस्तृत विवेचन यामध्ये केलेले आहे. व्यवस्थापनाच्या सर्व बाजूंचा येथे बारकाईने विचार केलेला आहे.
या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी ‘व्यवस्थापनाची तत्त्वे व पद्धती’ हे संदर्भ पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.