यशवंतराव चव्हाण म्हणजे अव्वल ‘लोकनेता’! त्यांच्या सामाजिक धोरणांची चर्चा सातत्याने होते, पण त्याचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आजतागायत कुठल्याही पुस्तकात झालेला नाही. ब्राह्मणेतर चळवळ आणि स्वराज्य चळवळ यांचा सारांश म्हणजे त्यांचं सामाजिक धोरण.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सच्च्या कार्यकर्त्यांची एक अखंड परंपरा आहे. शहरी मध्यमवर्गीय समाज, शेतकरी, कामगार अशा विविध स्तरांनी या धडाडीच्या कार्यकर्त्यांना आपले प्रतिनिधी मानलं. या कार्यकर्त्यांच्या विचारधारा, त्याच्याशी जोडले गेलेले समाजातील विविध स्तर आणि त्यांचे परस्परांशी असणारे हितसंबंध यांचा सारांश या पुस्तकातून सिद्ध होत जातो. आणि तोच सारांश यशवंतराव चव्हाण प्रत्यक्ष समाजकारणात राबवित होते. त्यांच्या याच सारांशामागचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण रा. ना. चव्हाण आपल्या विवेचनातून करत जातात.
त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ यशवंतरावांच्या समाजकारणाचा आढावा नाही, तर त्यांच्या समाजकारणाची मुळंच हे पुस्तक आपल्यासमोर मांडत जातं. म्हणून ते केवळ क्रमिक पुस्तक न राहता, तो धोरण-निश्चितीच्या क्षेत्राला उपयुक्त असा संदर्भ-ग्रंथ ठरतो.