मराठीतील पहिला अतिनायकः वैनतेय’ याची साहसयात्रा

'वैनतेयः एक गरुड योद्धा' या कादंबरीतून वाचकांना वैनतेय या मराठीतील पहिल्या अतिनायकाची ओळख झाली. याच मालिकेतील दुसरी रोमहर्षक कादंबरी, 'कालधर' नुक्तीच प्रकाशित झाली आहे. त्यातील एक अंश इथे रसिक वाचकांसाठी दिला आहे. 

.

 

कालक आणि वैनतेय एकमेकांच्या पुढे आले. बाकी सर्व आता मागे गेले होते. त्यांना लढण्यासाठी पुरेसा अवकाश मिळावा म्हणून. पुढे काय होईल याची उत्सुकता सर्वांमध्येच होती. दोन अद्वितीय योद्धे प्रथमच एकमेकांशी झुंझणार होते. हे एक आखलेलं युद्ध होतं त्यामुळे कोणी कोणाचा जीव घेणार नव्हता. तरीही यांतील जया-पराजयाला खूप महत्त्व होतं. निदान वैनतेयसाठी तरी. तो हरला तर त्याला वाहन बनावं लागणार होतं कालधरचं. लढत तुल्यबळ ठरली तर कालधर त्याला सोडून हवं ते वाहन घेणार होता. पण त्यामुळे वैनतेयची योजना फसणार होती. कालधर मायावीला घेण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे युद्ध जिंकलं तरच वैनतेयला आपल्या मनाप्रमाणे मायावीला कालधरला सोपवता येणार होतं. मायावी एक महासर्प होता आणि मायावीयुद्धांत पारंगत होता. त्याच्या शरीरावर जरी सत्ता गाजवता येत असली तरी त्याच्या मनावर सत्ता गाजवणं कठीण होतं. त्यामुळे कालधरविरूद्ध निर्णायक क्षणी मायावीला आपल्याकडे वळवणं वैनतेयला शक्य होऊ शकलं असतं. शतचंडीच्या बंधनात असतांनाही मायावीचा असाच उपयोग झाला होता वैनतेयला. मायावीनंच हा उपाय सुचवला होता त्याला. स्वतः दास होण्याचं मान्य करून त्यानं इतरांचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवलं होतं. वैनतेयला त्याचा अभिमान वाटला. त्याचं मन हलकं झालं. उत्साही झालं.

प्राज्ञ निसर्गानं युद्धाचे नियम सांगितले. एक तटस्थ पंच म्हणून तिला दोन्ही पक्षांनी मान्यता दिली होती. युद्ध अर्धा प्रहर लढलं जाणार होतं. तिनं आखलेल्या वर्तुळातच लढलं जाणार होतं. युद्ध जीवघेणं असणार नव्हतं. त्यामुळे शक्य असलं तरी प्रतिस्पर्ध्याचा जीव घेता येणार नव्हता. लढत तुल्यबळ ठरली की नाही याचा निर्णय निसर्गा घेणार होती आणि तो सर्वांना बंधनकारक ठरणार होता. तिनं सूचना करताच दोन्ही योद्धे समोर वतुर्ळात आले. वैनतेयच्या हातात यशोधरची तरवार होती. कालकच्या हातात कालधरची गदा होती. दोघेही एकमेकांना जोखत होते. कयास बांधत होते.

..वैनतेयला गदा हवी होती. कालक गदेच्या एका प्रहारानंच त्याचा चेंदामेंदा करेल..

यशोधर मायावीच्या कानात कुजबुजला.

..यशोधर हे युद्ध सुरू होऊ दे. वैनतेयची तुला नव्यानं ओळख होईल. मी पाहिलंय त्याला लढतांना..

आणि तेव्हा तो केवळ बारा वर्षांचा होता. आता तर तो तरुण आहे. काळगुहेत जाऊनही सुरक्षित आहे. त्याच्या सुप्त शक्तिही पूर्णपणे जागृत झाल्या आहेत. तो आता काय करेल हे बघण्याची उत्सुकता मायावीलाही होती. या एका युद्धानं वैनतेयसहीत मानवांचं, सर्पांचं आणि गरुडांचंही भवितव्य ठरणार होतं.

वैनतेयनं आपलं मन स्थिर केलं आणि कालककडे पाहिलं. तो त्यांच्या मनात शिरण्याचाच प्रयत्न करत होता. तो थबकला. हसला. वैनतेय मात्र गंभीर होता. त्यानं आपल्या हातात तरवार पेलली आणि कालकवर चालून गेला. कालकनं त्याचा वार चुकवला. त्याच्यात वेग आहे तर. वैनतेय पुटपुटला. त्यानं मागं वळून पाहिलं आणि कालक त्याच्यावर चाल करून येतांना दिसला. त्यानं दोन्ही हातांत गदा पेलली होती. तिचा एक जबरी वार त्यानं वैनतेयवर टाकला. वैनतेयनं आपली तरवार आडवी धरली. पण तिचे दोन तुकडे करत कालकची गदा वैनतेयच्या छातीवर आदळली. कानठळ्या बसणारा एक आवाज आला. आकाशात वीज कडाडली होती. त्याचवेळी पावसाला सुरूवात झाली. वैनतेय आपल्या गुडघ्यांवर बसला होता. कालक त्याच्यावरती उभा होता आणि त्याची गदा वैनतेयच्या छातीवर होती. हिमालनं आपले डोळे मिटले. तिनं यशोधरचा हात धरला. तो वैनतेयकडेच बघत होता. त्याला वाटलं की वैनतेयच्या छातीचे तुकडे तुकडे उडतील. पण तसं काही झालं. रक्ताचा एक थेंबही त्याला दिसला नाही. पावसाचं पाणी मात्र अगणित थेंबांनी त्याच्यावर कोसळत होतं.

..हिमाल तो उठतोय. बघ..

हिमालनं भितभितच डोळे उघडले. वैनतेय वर उठत होता. कालकची गदा अजूनही त्याच्या छातीवरच होती. त्यानं आपली संपूर्ण शक्ति त्यात ओतली होती पण वैनतेयही पूर्ण ताकदीनिशी उठत होता. कालकच्या डोळ्यांत आणखी एक भावना तरळली. नवल. हे काहीतरी वेगळं होतं. त्याच्या प्रहारातून कोणीही वाचलं नव्हतं आजवर. आणि याच्या छातीवर साधा ओरखडाही उमटला नव्हता.

..वैनतेय वज्रदेही आहे यशोधर. त्याला काही होणार नाही.. मायावीनं अभिमानानं म्हटलं.

वैनतेयची वज्रकाया त्या प्रहारानं चेपली गेली होती पण ती भंगली नाही. त्यानं दोन्ही हातांनी कालकची गदा आता पकडली आणि त्या गदेसकटच त्याला दूर भिरकावून दिलं. वर्तुळाच्या बाहेर जाण्यापूर्वीच त्यानं स्वतःला सावरलं. पहिली सलामी झाली होती. पावसाचा मारा किंचीत वाढला होता.

..त्याला गदा द्या..

निसर्गाचा आवाज घुमला. कालधरच्या एका सैनिकानं आपली गदा वैनतेयकडे फेकली. युद्ध पुन्हा सुरू झालं. यावेळेस वैनतेयनं आक्रमण केलं. स्वतःभोवतीच वेगानं गिरक्या घेत कालककडे सरकला. कालकनंही तोच पवित्रा घेतला. दोघांचाही वेग अफाट होता. दोघांच्या चहुबाजूंनी केवळ गदा एकमेकांवर आपटल्यानं उठणारा ठिणग्यांच्या रेषा तेवढ्या नाचत होत्या. मग एकाएकी वैनतेय उसळला आणि त्यानं कालकच्या पाठीवर घाव घातला. कालक आपल्या पोटावर आदळला आणि जमिनीत अर्धा अधिक धसला. पण त्याच्या अंगावरच्या अदृष्य कवचानं त्याचं रक्षण केलं होतं. पण अगदी प्रथमच तो काहीसा दमल्यासारखा वाटत होता.

..त्याला संपव वैनतेय. फेकून दे रिंगणाबाहेर..

हिमाल ओरडली. यशोधर आणि इतरांनीही तिला साथ दिली. वैनतेय कालककडे वळला. कालक उठण्याचा प्रयत्न करता होता. वैनतेय धावला आणि त्यानं पुन्हा एक जोरदार तडाखा त्याच्या पाठीवर हाणला. कालक पुन्हा मातीत धसला. तो उठेल म्हणून त्यानं काही वेळ वाट बघितली पण तो उठला नाही.

..त्याला फेकून दे रिंगणाबाहेर वैनतेय. या अंधारवनाबाहेरच फेकून दे जमल्यास..

मायावीनं आरोळी ठोकली.

वैनतेयनं आपली गदा बाजूला फेकली आणि तो कालककडे जाऊ लागला. तेवढ्यात कालक वळला. त्यानं वैनतेयकडे पाहिलं आणि वैनतेय होता तिथेच थबकला. मग कालक सावकाश उठला.

..त्यानं काळ गोठवलाय..

यशोधर कुजबुजला. त्यानं कालाक्षीला असं करतांना पाहिलं होतं. कालकही तेच करत होता. त्याला वाटलं झालं. संपलं सारं.

..कालक कालक कालक कालक..

आता कालधरच्या सैनिकांच्या हिडीस आवाजात घोषणा सुरू झाल्या.

कालकनं काही काल विश्रांती घेतली आणि मग गदा घेऊन प्रचंड वेगानं वैनतेयवर झेपावला.

आपल्या सर्व हालचाली एकाएकी मंदावल्या कशा हे कळायला वैनतेयला काही क्षणच लागले. मग त्यानं त्यावरचा उपाय शोधायला सुरूवात केली. पण त्याला काही कळेना. समोरून आता कालक धावून येत होता. त्याच्या मनांत एकाएकी भय उपजलं आणि दुसऱ्याच क्षणी त्याची स्वयंस्फूर्त गरुड शक्ति पूर्ण वेगानं उफाळून आली.

वैनतेयकडे झेपावलेला कालक तितक्याच वेगानं मागे फेकला गेला. आणि मग त्यानं ते अद्भूत पाहिलं. वैनतेयचं गरुड रुप. काळाचा चिवट पोलादी पिंजरा तोडून मुक्त झालेलं. कालधर, नागराज आणि कालधरचे सैनिकही ते रुप पाहून थक्क झाले.

मागे फेकलं जात असतांना कालकच्या चेहऱ्यावर आतापर्यंत तरळणारं हास्य आता लोपलं होतं. तो परत उठला तेव्हा वैनतेय परत त्याच्या सामान्य रुपात त्याच्यावर चालून येत होता. कालकच्या डोळ्यांत प्रथमच अंगार पेटला. त्यानं आता हातातली गदा फेकली आणि त्यानं शड्डू ठोकत वैनतेयला मल्लयुद्धाचं आव्हान दिलं.

..वैनतेय तो घात करेल तुझा. त्याला स्पर्श करू नको..

यशोधरनं पुन्हा एकदा ओरडून सांगितलं. वैनतेयनं त्याही परिस्थितीत हात उंचावून यशोधरला काळजी न करण्याविषयी सांगितलं. तो कालकपुढे गेला आणि त्याला काही तरी म्हणाला. पुढच्याच क्षणी त्यानं आपला उजवा हात समोर केला आणि कालकनं पुन्हा हसत आपला उजवा पंजा त्याला भिडवला. यशोधरला वाटलं की झालं. काही क्षणांतच कालक आता वैनतेयची सारी शक्ति शोषून घेईल. पण तसं झालं नाही. दोन्ही योद्धे आपली पूर्ण शक्ति पणाला लावून एकमेकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणीच माघार घेत नव्हतं. त्यांचे पाय जमिनीत रुतले जात होते, अंगातून घामाच्या उष्ण धारा वाहत होत्या, ज्या वरून पडणाऱ्या थंड पाण्यात मिसळून तिथं वाफेचं एक हलकं आवरण तयार होत होतं. हे अनंत काळ चालू राहिल असं वाटत असतांनाच निसर्गाचा आवाज घुमला.

..वेळ संपली. दोन्ही योद्ध्यांना विनंती की त्यांनी लढत संपवावी..

कालकनं वैनतेयच्या डोळ्यांत पाहिलं. तिथं त्याला कोणतीही भिती दिसली नाही. तो हसला. आणि त्यानं आपली पकड सैल केली. वैनतेयनंही. काही वेळ दोघंही एकमेकांना रोखून बघत राहिले. मग आपापल्या जागी परतले.

..कालधर, ही लढत तुल्यबळ ठरली आहे हे तुम्हीही मान्य कराल. तुमच्या अटीनुसार आता तुम्ही वैनतेय सोडून आमच्यापैकी कोणाचीही तुमचं वाहन म्हणून निवड करू शकता. कालाक्षीला प्रतिविषाची मात्रा देण्याची जबाबदारी आता तुमचीच असेल..

कालधरनं मान हलवत होकार भरला. त्याचा बहुतेक आधीच निर्णय झाला होता. त्यानं वैनतेय आणि त्याच्या सोबत्यांकडे पाहिलं. यशोधर तिथं समोरच उभा होता.

..तो माझीच निवड करेल हिमाल. कालाक्षीलाही तोच धाक होता. म्हणूनच तिनं मला तिच्या सोबत ठेवलं होतं. मी तसाही राष्ट्रकच आहे. माझ्यावर तो फार अत्याचार करणार नाही अशी अपेक्षा आहे. वैनतेय तू लवकरच माझी सुटका करशील अशी आशा बाळगतो..

..मला हिमाल हवी आहे..

अचानक कालधरचा आवाज आला. कालधरकडे जाणारा यशोधर थबकला. त्यानं काहीच न कळून आधी हिमालकडे आणि मग कालधरकडे पाहिलं. याला काय वेड लागलंय की काय? हिमालला आपण काय ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता. ती खुळ्यासारखी हसली. काहीतरीच.

..मला हिमाल हवी आहे माझं वाहन म्हणून. शिवाय तिनं स्वतःच कालाक्षीला प्रतिविषाची मात्रा देणं अधिक न्याय्य ठरेल. तिच्या दोन मैत्रिणी आधीच तिथं आहेत त्यामुळे तिला करमेलही..

कालधर थट्टा करतोय का? पण त्याच्या चेहऱ्यावरून तरी तसं दिसत नव्हतं. नागराजला वाटलं. मग त्यानं विचार केला. कालधरचं वाहन होण्यासाठी हिमाल अगदीच वाईट पसंती नव्हती. ती कृष्ण गरुडांची प्रमुख होती, युद्धकुशल होती, शक्तिसंपन्न होती, शतमुखीची माहितीही होती तिला. मानवांपेक्षा ती नक्कीच उजवी होती. पण एक पुरुष असलेला कालधर आता स्त्रीरुपात जगेल? त्याला थोडं हसू आलं. फक्त ते बाहेर पडणार नाही याची त्यानं दक्षता घेतली. पण त्याच्या मनातले प्रश्न यशोधरनं विचारले.

..कालधर ती स्त्री आहे..

..मग?..

त्याच्या या थेट प्रश्नावर काय बोलावं ते यशोधरला समजलं नाही.

..लिंगभेद मानवांना असतो यशोधर. मी प्रेत-मानव आहे. मला उत्तम वाहन हवंय फक्त. तुझ्यापेक्षाही ती प्रबळ आहे. देहानं आणि मनानंही. तसंही स्त्रियांचं मन खूप कणखर असतं. माझ्यात सध्या तिच एक उणीव आहे. चल हिमाल, ये. तुझं स्वागत आहे. कालधरचं वाहन होण्याचा मान मिळालाय तुला. चेहऱ्यावर थोडं तरी हसू ठेव तुझ्या..

हिमाल काहीच बोलली नाही. तिनं वैनतेयकडे पाहिलं. तोही थोडासा गोंधळला होता. ही निवड त्याला अगदीच अनपेक्षित नव्हती तरीही त्याला वाईट वाटलं.

..हिमाल, मला क्षमा कर. असं होणार नाही असं वाटलं होतं मला. पण मी प्रयत्न करेन तुला सोडवण्याचा. तुम्हा सर्वांनाच लवकरच सोडवेन मी इथून. वज्रप्रियेला तसा निरोप दे माझा. कालाक्षीलाही. आणि तुझ्या अनुपस्थितीत मी कृष्ण गरुडांचं नेतृत्त्व करेन स्वतः..

हिमालनं त्याला मिठी मारली. काही वेळानं आपल्या सोबत्यांचा निरोप घेऊन तिनं कालधरच्या दिशेनं जायला सुरूवात केली. ती पावलं आता परत कधी फिरणार होती हे कोणालाच माहित नव्हतं. 

 

"कालधर " ही कादंबरी विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा -

https://dpbooks.in/products/kaaldhar